मतदान केंद्रावरील ‘त्या’ ३ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. यात पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथील मतदान केंद्रावर पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी मुलासोबत मतदान करून व्हिडिओ काढला व कर्मचार्‍यांनी मुलाच्या बोटाला शाई लावली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील कामकाजात बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत मतदान केंद्रावरील तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, निलंबित केलेल्यांमध्ये केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी आणि होमगार्ड या तिघांचा समावेश आहे. पाचोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोली क्रमांक चारमध्ये हा प्रकार घडला होता. केंद्रप्रमुख दिलीप देवराव नरवडे (सहायक शिक्षक) मतदान अधिकारी संगीता नामदेव केदार (सहायक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा कल्याणनगर, पाचोड) आणि रेणुका सुरेश बोंबले (होमगार्ड, पैठण पथक) या तिघांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे.
मतदानाच्या दिवशी लहान मुलासोबत मतदान कक्षात प्रवेश होऊन मतदान प्रक्रियेची गोपनीयता धोक्यात येईल, अशी स्थिती निर्माण होऊ दिली. आवश्यक ती दक्षता न घेता दिलेल्या प्रशिक्षणानुसार नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे या तिन्ही कर्मचार्‍यांना स्पष्टीकरण मागितले होते. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण अमान्य ठरवत तिघांनाही महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १३४ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितों अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार मतदान समाप्त झाल्याच्या क्षणापासून शासकीय सेवेतून तात्त्पुरते निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण यांना देण्यात आले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.